जळगाव(प्रतिनिधी)आजकालची तरुणाई व्यसनाधीनतेकडे वळू लागली आहे. कोणतेही व्यसन टप्प्याटप्प्याने वाढू लागल्याने व्यसन करणाऱ्यांचे आठ प्रकारचे नुकसान होते. त्यामुळेच व्यसन करणाऱ्यांना प्रत्येक ‘व्यसन’ विनाशाकडेच नेते असे प्रतिपादन चेतना व्यसनमुक्ती उपचार केंद्राचे संचालक डॉ. नितीन विसपुते यांनी केले. ते खोटे नगर येथील सीताबाई भंगाळे स्कूलमध्ये रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल यांच्यातर्फे ‘व्यसनमुक्ती’ विषयावर सोमवारी, १७ फेब्रुवारी रोजी आयोजित व्याख्यानात बोलत होते. अध्यक्षस्थानी रोटरीचे अध्यक्ष दिनेश थोरात होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चेतना व्यसनमुक्ती उपचार केंद्राच्या चेतना विसपुते, रोटरीचे विनोद बलदवा, दीपक नाथानी, मुख्याध्यापक नरेंद्र बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे शाळेच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
डॉ.विसपुते पुढे म्हणाले की, आजकाल व्यसनांच्या गर्तेत तरुणाई भरकटू लागली आहे. त्यामुळे अशा व्यसन करणाऱ्यांचे आठ प्रकारचे नुकसान होत आहे. त्यात मानसिक, आध्यात्मिक, शारीरिक, लैंगिक, पारिवारिक, आर्थिक, सामाजिक, नैतिक यांचा समावेश होतो. टप्प्याटप्प्याने व्यसन वाढू लागल्याने ते विनाशाकडेच नेत असल्याचे अनेक उदाहरणे डोळ्यासमोर घडतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा वाईट व्यसनांपासून दूर राहण्याची गरज आहे. व्यसन केल्यामुळे नुकसानच होते. त्यामुळे मनावर ताबा ठेवून व्यसनांना दूर ठेवावे. आपला मित्रपरिवार, नातेवाईक आणि इतर संबंधांमध्ये दुरावा निर्माण होणार नाही, त्याची काळजीही घेण्याची गरज आहे. अशा व्यसनांना दूर ठेवण्यासाठी “१३८” चा मंत्र फायदेशीर ठरतो. त्यात ‘एक’ म्हणजे दिवसातून एक वेळा व्यायाम, ‘तीन’ म्हणजे दिवसातून तीन वेळा आहार म्हणजे जेवण आणि सर्वात शेवटी ‘आठ’ म्हणजे आठ तास गाढ झोप, असा मूलमंत्र जीवनात अंगीकारण्याची गरज असल्याचेही डॉ. विसपुते यांनी सांगितले. त्यांनी व्याख्यानात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विविध उदाहरण देऊन त्याचे स्पष्टीकरण करून समाधान केले. तसेच त्यांनी १९२० मध्ये रंगमंचावर आलेल्या “एकच प्याला” नाटकातील प्रसंगांची आठवण करून देऊन दारुमुळे काय नुकसान होते, त्याविषयही मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणासोबत भविष्यात व्यसनमुक्त राहून व्यसनमुक्तीचे कार्य करण्याविषयीही सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी व्यसन न करण्याची शपथ घेतली.
यशस्वीतेसाठी दीपनंदा पाटील, सारिका सरोदे, विजय नारखेडे यांच्यासह शाळेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन तथा आभार विजया चौधरी यांनी मानले.
Leave a Reply