विद्यार्थ्यांनी आई-वडिलांना दैवत मानून त्यांची नित्यनेमाने आज्ञा पाळावी रांजणी येथील कार्यक्रमात सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांचे प्रतिपादन.

जामनेर/(प्रतिनिधी) विद्यार्थ्यांनी दररोज सकाळी उठल्याबरोबर आई-वडिलांना नतमस्तक व्हावे. तसेच आई-वडिलांना दैवत मानून त्यांची नित्यनेमाने आज्ञा पाळावी, असे प्रतिपादन सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रभाकर तुकाराम पाटील (पी.टी.पाटील) यांनी केले. ते जामनेर तालुक्यातील रांजणी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विद्या मंदिरात आयोजित पुस्तक वाटपप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोपाल फरफट होते. प्रमुख पाहुणे म्हणून मिराबाई पाटील, माजी अध्यक्ष वासुदेव साखरे, मुख्याध्यापक प्रकाश मावरे आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, जे विद्यार्थी आई-वडिलांची तसेच शिक्षकांची आज्ञा पाळून परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यास करतात. त्यांना नक्कीच सुयश प्राप्त होते. त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवावा, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांची नात अंशिका हिच्या वाढदिवसानिमित्त रांजणी शाळेतील सर्व २३५ विद्यार्थ्यांना स्वलिखित चारोळी “किलबिल” काव्यसंग्रह आणि खाऊचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पी.टी.पाटील सेवानिवृत्त झाल्याबद्दल शाळेच्यावतीने शाल, गुलाबपुष्प, भेटवस्तू देवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.
‘म्हातारीची शेती होती’ कृतीयुक गीत केले सादर
याप्रसंगी उपशिक्षक जुगलकिशोर ढाकरे, प्रवीण जाधव, श्रीकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी पी.टी.पाटील यांनी ‘म्हातारीची शेती होती’ हे कृतीयुक गीत सादर केले. यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक गजानन सत्रे, वैशाली कदम, पूनम डकले, मनीषा देसले यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक उपशिक्षक प्रवीण जाधव, सुत्रसंचलन श्रीकांत पाटील तर आभार मोहनसिंग खोनगरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *