जामनेर (प्रतिनिधी)जामनेर येथील बांधकाम कामगार कल्याण कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यास मारहाण झाल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी सहा वाजे दरम्यान घडला. महाराष्ट्र शासनाकडून कामगार नोंदणी करून घेत बांधकामावरील सुरक्षा साहित्य व घरात संसारासाठी लागणारे साहित्य वाटप करण्याची योजना राबवण्यात आली होती. याचा मोफत लाभ मिळत असल्याने कामगार नोंदणीसाठी सर्वांनीच धाव घेतली होती. यातूनच ऑनलाईन काम करणारे खाजगी व्यक्ती अवास्तव पैसे घेत असल्याच्या तक्रारी होत्या. यात कार्यालयातील कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे सुविधा केंद्र चालकांकडून सांगितले जात होते.जामनेर येथील बांधकाम कामगार कल्याण कार्यालयात
ललित गोविंद साबळे हे नोंदणी झालेल्या कामगारांना कार्ड वाटपाचे काम करतात. कामगार नोंदणीचे ऑनलाइन काम करणाऱ्या विष्णू रामदास उंबरकर यांनी कार्यालयात येऊन मजुरांचे कार्ड मागितले. ते न दिल्याने मारहाण केल्याची तक्रार साबळे यांनी जामनेर पोलीस ठाण्यात केली आहे.विष्णू उंबरकर हा वाघारी येथील सेतू सुविधा केंद्र चालवतो.कामगार नोंदणी केल्यानंतर उंबरकर नोंदणी कार्ड मागण्यासाठी येत होता. नियमानुसार नोंदणी कार्ड हे स्वतः मजुरास द्यावे अशा सूचना आहेत. उंबरकर यास नकार दिल्याने त्यांनी मारहाण केली असा दावा साबळे यांनी केला आहे. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामगार नोंदणीसाठी पैसे देण्याघेण्याच्या कारणावरून हा वाद झाला असल्याचे दोघांच्या बोलण्यातून समजते तर नोंदणीसाठी मजुरांकडून मी दोनशे रुपये घेतो कार्यालयातील कर्मचारी मात्र मला आठशे रुपये मागतात असे आरोप उंबरकर याने पत्रकारांशी बोलताना केले आहेत.
Leave a Reply