मुंबई /मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अलीकडच्या घटनांमध्ये 9 गुन्हे नोंद झाले असून, त्यामध्ये 19 आरोपींपैकी 13 आरोपी हे विधि संघर्षित बालक आहेत. या 16 वर्षांखालील मुलांमध्ये गुन्हेगारीला ‘थ्रिल’ समजण्याची प्रवृत्ती वाढत असून, ‘कोयता गँग’चे महिमामंडन या मुलांना गुन्हेगारीकडे आकर्षित करत आहे. ‘दिशा’ प्रकल्पाच्या माध्यमातून विधि संघर्षित बालकांना सकारात्मक मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमांतर्गत फुटबॉल आणि विविध प्रशिक्षण देऊन या मुलांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. अनेक मुलांनी या माध्यमातून सकारात्मक जीवनाचा स्वीकार केला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या वाढत्या विस्तारावर नियंत्रण मिळवण्यासाठी 7 नवीन पोलीस ठाण्यांची स्थापना करण्यात आली आहे. खराडी, वाघोली, नांदेड फाटा, आंबेगाव, काळेपडळ, फुरसुंगी आणि बाणेर येथे नवीन पोलीस ठाणी कार्यान्वित होणार आहेत. सीसीटीव्ही नेटवर्क अधिक बळकट करून पोलिसिंगला अधिक परिणामकारक बनवले जात आहे. हे नेटवर्क गुन्हेगारांना वेगाने शोधण्यात आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. नवीन भारतीय न्यायसंहितेनुसार, 18 वर्षाखालील मुलांचा गुन्ह्यात वापर करणाऱ्यांवर आता थेट गुन्हा केल्याप्रमाणे कारवाई करता येईल. या कठोर तरतुदींमुळे बालकांचा वापर करून गुन्हे घडविणाऱ्या प्रवृत्तींना आता चाप बसणार आहे, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे.
Leave a Reply