ज्ञानगंगा विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी विद्यार्थ्यांनी दिला अहिल्याबाईंच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा

जामनेर (प्रतिनिधी) येथील ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामनेर येथे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.त्यावेळी महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य श्री राजेंद्र सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
गुरुपौर्णिमेच्या या पावन प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांना गुलाबपुष्प देऊन त्यांच्या प्रति आदर व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला एक अनोखी आणि प्रेरणादायी भेट दिली. त्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तक सप्रेम भेट म्हणून शाळेच्या ग्रंथालयासाठी अर्पण केली. या उपक्रमाचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे सर होते.त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांनी केलेल्या आयोजनाचे कौतुक केले. सोनवणे सरांनी अध्यक्ष भाषणात विद्यार्थ्यांना जीवनात गुरुंचे महत्त्व अनमोल असल्याचे सांगितले आणि ज्ञानाच्या निरंतर शोधात राहण्यासाठी प्रेरित केले.
इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम सादर केल्याने, त्यांच्यातील नेतृत्वगुण आणि संघभावना दिसून आली. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक मूल्यांची रुजवात होऊन, त्यांना प्रेरणा मिळाली.
विद्यालयातील शिक्षकवृंद, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *