एमपीएससी परीक्षांचे वेळापत्रक यूपीएससीप्रमाणे स्थिर करणार

मुंबई /मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी परीक्षांचे वेळापत्रक (कॅलेंडर) यूपीएससीप्रमाणे निश्चित करणार असल्याचे विधानपरिषदेत सांगितले. गेल्या पाच-सात वर्षांपासून विविध न्यायालयीन आदेशांमुळे वेळापत्रक बदलावे लागत असल्याचे सांगत त्यांनी यापुढे पारदर्शक आणि नियोजित पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्धार व्यक्त केला. वर्ष 2025 पासून एमपीएससीच्या परीक्षा डिस्क्रिप्टिव पद्धतीने होणार आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थी यूपीएससी आणि एमपीएससीच्या तयारीमध्ये समन्वय साधू शकतील.

एमपीएससीच्या पारदर्शी प्रक्रियेचे कौतुक करताना मुख्यमंत्री म्हणाले की, परीक्षा प्रक्रियेत गोंधळ होऊ नये यासाठी एमपीएससी स्वतः पेपर सेटिंग आणि परीक्षेचे नियोजन करते. मात्र, काही इन्फ्रास्ट्रक्चर बाहेरच्या एजन्सीकडून घेतले जाते. यापुढे एमपीएससीच्या जागा वेळेत भरल्या जाव्यात, कामकाजात गतिशीलता आणि प्रभावीपणा यावा, यासाठी राज्य सरकारने एक नवीन स्ट्रक्चरिंगचा प्रस्ताव तयार केला आहे. एमपीएससी स्वायत्त असल्यामुळे एमपीएससीसोबत देखील चर्चा केलेली आहे त्यांचंही म्हणणं काय आहे हे आपण समजून घेतलेल आहे आणि त्या अनुरूप यापुढेही कारवाई करण्यात येईल.

एमपीएससीमध्ये सध्या तीन सदस्यांच्या जागा रिक्त असून, त्यातील एका जागेच्या नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. उर्वरित दोन जागांचीही भरती लवकरच पूर्ण होईल. त्याचप्रमाणे एमपीएससीकडून आता वर्ग 1, वर्ग 2 आणि वर्ग 3 च्या परीक्षा घेतल्या जात आहेत. या परीक्षांचे वेळापत्रक स्थिर करून वेळेत भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *