लॉर्ड गणेशा स्कूल , जामनेर येथे मराठी भाषा गौरव दिन संपन्न….!

जामनेर(प्रतिनिधी) लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूल , जामनेर येथे मराठी साहित्याचे मुकुटमनी मा. तात्यासाहेब वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या स्मरणार्थ दि. २७ फेब्रुवारी गुरुवार रोजी ” मराठी भाषा गौरव दिन ” म्हणून मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न करण्यात आला. सर्वप्रथम कार्यक्रमप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य  धनंजाॅय सिंह, उपप्राचार्य गणेश पालवे,समन्वयिका मर्लिन सिल्वेस्टर यांनी वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मराठी विभागप्रमुख नकुल ठोंबरे यांनी केले. सरांनी त्यांच्या प्रास्ताविकपर भाषणात मराठी भाषा गौरव दिन का संपन्न केल्या जातो यासंदर्भात माहिती सांगितली. नंतर इयत्ता ७ वी व ८ वीतील प्रज्ञा सुरळकर,करुणा सुरळकर , सई पाटील,पलक दसरे, संजीवनी काटकाळे या विद्यार्थिनींनी ” महाराष्ट्र भूमीवर जन्मलो हा माझा अभिमान ” या मराठी गीताचे गायन करून उपस्थिताना मंत्रमुग्ध केले.

तदनंतर विद्यालयातील इयत्ता ७ वीतील आराध्या भगत व दक्ष पाटील यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. नंतर इयत्ता ८ वी तील सानिका देशमुख , दिविजा पालवे , जान्हवी देशमुख, दिव्या गव्हाळे या विद्यार्थिनींनी मराठ मोळा वेष परिधान करून ही मायभूमी……..ही……..कर्मभूमी या मराठी गीतावर बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. शिक्षक प्रतिनिधी तर्फे विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक आशिष जी. दाभाडे यांनी मराठी राजभाषेचा व मराठी माणसाने भारतात तसेच जागतिक स्तरावर उमटवलेला ठसा याविषयी परिचय करून दिला आणि मराठी भाषेचा महिमा या संदर्भात ‘ क ‘ च्या अद्भुत क्लासविषयी मराठीच्या गोडव्याचे वाचन केले. तसेच विद्यालयाचे उपप्राचार्य मा. गणेश पालवे सर यांनी अभिजात भाषा म्हणजे काय ? भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळतो याची तपशीलवार माहिती सांगून विद्यार्थ्यांना उदबोधनपर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन इयत्ता ८ वीतील कु. भाविका शेळके व कु. तेजस्विनी टहाकळे यांनी तर आभार सहाय्यक शिक्षिका मा. छाया लव्हाळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूल नियमितपणे परिपाठात थोर पुरुषांच्या जयंती – पुण्यतिथी संपन्न करीत असते याद्वारा विद्यार्थ्यांना प्रेरणात्मक ऊर्जा मिळते व त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *