जळगाव(प्रतिनिधी) :मानवाच्या शरीराचे ‘लिव्हर’ आणि ‘किडनी’ अतिशय महत्त्वाचे अवयव आहेत. लिव्हर चांगले राहण्यासाठी फायबर (कच्चा भाजीपाला) अन्न नियमित सेवन करावे. त्यामुळे निरोगी जीवन जगण्यासाठी मदत होते. यासोबतच मानवाने वयाची शतकी अर्थात शंभरी गाठायची असल्यास ‘ढोलकीच्या तालावर’ गाण्याप्रमाणे तळपायाची ढोलकी करून वाजविली पाहिजे, असे प्रतिपादन पुणे येथील निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. सुनील चव्हाण यांनी केले. येथील राष्ट्रीय महामार्गालगतच्या जलाराम बाप्पा मंदिराशेजारील चेतना व्यसनमुक्ती उपचार केंद्रातील साधना सभागृहात मंगळवारी,
२५ फेब्रुवारी रोजी ‘करू या लिव्हर अन् किडनी सोबत मैत्री’ विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. नितीन विसपुते, व्यवस्थापक प्रतिक सोनार, डॉ. ए.एम.चौधरी, डॉ.प्रमोद ठाकूर, डॉ.दिनेश महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला डॉ.सुनील चव्हाण यांचे डॉ. नितीन विसपुते यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी डॉ.सुनील चव्हाण यांनी रुग्णमित्रांना आहार, विहार, विचार आणि व्यसनमुक्तीसाठी टिप्स देऊन धडे दिले.ते पुढे म्हणाले की, आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी दिवसातून दोन वेळा वेळेवर जेवण करणे गरजेचे आहे.
सकाळी पिल्या जाणाऱ्या चहाबद्दल नाण्याप्रमाणे दोन बाजू आहेत. त्यामुळे रोज सकाळी पिला जाणारा चहा हे पेय आरोग्यासाठी विष आहे. त्यामुळे प्रत्येकाने चहा पिणे टाळल्यास योग्य ठरेल. रोज सकाळी कढीपत्त्याची दहा पाने चावून खाल्ल्यास शरीरातील रक्त शुद्ध होते. तसेच कडुनिंबाचा पाला खाल्ल्याने लिव्हरमध्ये नवचैतन्य अथवा त्याची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. लिव्हरसाठी ‘पॅरासिटॅमॉल’ अर्थात ‘पेनक्युलर’ गोळीचे सेवन केल्यास ते घातक ठरते. त्यामुळे अशा प्रकारच्या गोळ्या घेणे टाळावे. यासोबतच कोमट पाणी करून त्यात हळद मिसळून प्यावे. त्याचीही शरीरासाठी चांगली मदत होते. तसेच ‘डीप डाइटप्रमाणे’ सकाळी आठ ते बारा या वेळेत फळे खाण्याची गरज आहे. आपले सद्यस्थितीला असणारे शरीराचे वजन गुणिले दहा याप्रमाणे ग्रॅम फळे खाण्याची गरज असल्याचेही डॉ.चव्हाण म्हणाले की, निरोगी किडनी दिवसभरात एक लिटर फिल्टर युरीन बाहेर फेकते तर रात्री ३०० एम.एल. युरीन बाहेर फेकते, असे असल्यास आपली किडनी नॉर्मल असल्याचे समजावे. मात्र, याउलट क्रिया झाल्यास ‘सावधान’ असे म्हणण्याची वेळ येते, तेव्हा किडनी आजारी असल्याचे समजावे. असा त्रास डायबिटीज असणाऱ्या रुग्णाला होतो. अशावेळी तज्ज्ञ डॉक्टरांना भेटून त्यांचा उपचारासाठी सल्ला घ्यावा. त्यामुळे सर्वांनी लिव्हरप्रमाणेच किडनीचीही काळजी घ्यावी. याबाबतीत कोरिया, जपान ह्या देशातील नागरिक जास्त जगणारे मानले जातात. तेथील नागरिक तळपायाची नेहमी काळजी घेत असल्याने तळपायाला दुसरे ‘हृदय’ मानतात. याच हृदयाला कनेक्ट करून डॉ.चव्हाण यांनी ‘ढोलकीच्या तालावर’ गाण्यावर तळपायाची ढोलकी करून रुग्णमित्रांना वाजविणे शिकविले. तसेच ‘ॲक्युप्रेशर पॉईंट’ म्हणजेच पाय तबल्यासारखे हाताने वाजवून रुग्णमित्रांना महत्त्व पटवून दिले. ई.एफ.टी. अर्थात ‘इमोशनल फ्रीडम टेक्निक’ यात व्यसनमुक्ती, हेल्थी, मन याविषयी त्यांनी रुग्णमित्रांना धडे देऊन त्यांच्याकडून व्यायाम करून घेतला. यासोबतच ‘महासती मीडिटेशन’द्वारे वर्तमानात कसे जगावे, याबाबत ‘अँटी ग्रॅव्हिटी’ योगाद्वारे महत्व समजावून सांगितले. ‘बायोलॉजिकल क्लॉक ऑफ द बॉडी’ याविषयी शरीर आणि त्याचे अवयव, त्याच्या वेळा सांगितल्या. ‘टाईम इज मेडिसिन’, ‘फूड मेडिसिन’ ‘झिरो व्होल्ट थेरपीविषयी सांगून त्याचे फायदेही सांगितले. तसेच कॅन्सरपासून सुटका कशी मिळवावी, त्याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रुग्णमित्रांनी विचारलेल्या प्रश्नांची डॉचव्हाण यांनी समर्पक उत्तरे दिल्याने रुग्णमित्रांनी समाधान व्यक्त केले. डॉ.नितीन विसपुते यांनी प्रास्ताविक करून रुग्णमित्रांना मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे कर्मचारी ज्ञानेश्वर पाटील, तुषार ठाकूर, किरण बाविस्कर, दीपक पाटील, चेतन बोरसे, अतुल सूर्यवंशी तसेच रामेश्वर सुरळकर, राजेंद्र चव्हाण यांच्यासह रुग्णमित्रांनी परिश्रम घेतले.
Leave a Reply