जळगाव/जामनेर(प्रतिनिधी)राष्ट्रीय महामार्गावरील जलाराम मंदिरालगतच्या चेतना व्यसनमुक्ती केंद्रामध्ये राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. नितीन विसपुते यांच्या समवेत व्यसनमुक्ती केंद्रातील दाखल असलेल्या सर्व रुग्णमित्रांनी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना अभिवादन केले. यावेळी डॉ. नितीन विसपुते यांनी मनोगतातून राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. यावेळी रुग्णमित्रांनी ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ असा जयजयकार केला. तसेच चेतना व्यसनमुक्ती केंद्राच्या परिसरात स्वच्छतेची मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला. यावेळी डॉ.ए.एम.चौधरी डॉ. प्रमोद ठाकूर, डॉ. दिनेश महाजन, चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे व्यवस्थापक प्रतीक सोनार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांसह रुग्णमित्रांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.
डॉ.विसपुते पुढे म्हणाले की, संत गाडगेबाबा यांनी समाजातली अराजकता ओळखली होती. त्यांनी त्यावेळी वाढत जाणारी बळी देण्याची प्रथा बंद केली होती. त्यांनी लोकांना विज्ञानाचा मार्ग दाखवला होता. तसेच वाईट परिस्थितीतून मार्ग काढला होता. त्यांनी समाजाला प्रश्नातून निरुत्तर करण्याचेही काम केले होते. त्यामुळे सर्व समाज त्यांच्या पाठीशी एकवटला होता. समाजासाठी काम करणाऱ्यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी केली जाते. अशातच संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करत असताना संत सर्व समाजाचे असतात. त्यामुळे त्यांचा वारसा जपण्याची गरज आहे. संत गाडगेबाबा यांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश सर्वांनी आत्मसात करावा. तसेच स्वच्छतेचा निर्धार करून स्वच्छता अंगी बाळगावी. यासोबतच रुग्णमित्रांनी स्वच्छ जीवन जगण्याची प्रेरणा घ्यावी. जीवनात चांगले बोलण्यामुळे हमखास यश मिळते. यासाठी ‘प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे’ असा गुणही अंगी बाळगण्याची गरज आहे. जीवन जगण्यासाठी आनंदही तेवढाच महत्वाचा आहे. बाबांनी गावोगावी स्वच्छता मोहीम कायम राबविल्याने गावेची गावे स्वच्छ करण्यासाठी लोकांना जागृत केले होते, असेही डॉ. नितीन विसपुते यांनी मनोगतात सांगितले. केवळ सात दिवसाची शाळा करणाऱ्या बाबांनी विज्ञानवादी दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून समाजाला नवीन दिशा देण्याचे काम केले. तसेच शंभर वर्षांपूर्वी केलेल्या स्वच्छता, अंधश्रद्धा गोष्टींवर प्रबोधन केल्याचेही डॉ.विसपुते म्हणाले. यशस्वीतेसाठी चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे कर्मचारी ज्ञानेश्वर पाटील, तुषार ठाकूर, किरण बाविस्कर, दीपक पाटील, चेतन बोरसे, अतुल सूर्यवंशी तसेच रामेश्वर सुरळकर, राजेंद्र चव्हाण यांच्यासह रुग्णमित्रांनी परिश्रम घेतले.
Leave a Reply