२५ वर्षांपासून सुरू असलेला शेत रस्त्याचा वाद सामोपचाराने मिटला! – मौजे हिंगणे (न.क.), ता. जामनेर येथे आदर्श समन्वयाची दखल

जामनेर(प्रतिनिधी) जामनेर तालुक्यातील मौजे हिंगणे (न.क.) येथे तब्बल २५ वर्षांपासून सुरू असलेला शेत रस्त्याचा वाद अखेर तहसील कार्यालय, जामनेर येथे दिनांक ०३ जुलै २०२५ रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान सामोपचाराने व आपसी समजुतीने निकाली काढण्यात आला.

सदर वाद सन २००० पासून विविध न्यायालयात, तसेच मा. उच्च न्यायालयात देखील सुरू होता. या वादात गट क्र. २८ चे धारक प्रमिलाबाई विजयसिंग पाटील व इतर व गट क्र. ५३ चे प्रतिवादी कवरसिंग दयाराम पाटील यांच्यात शेत रस्त्याच्या वहिवाटीबाबत दीर्घकाळ संघर्ष सुरू होता.

स्थानिक पातळीवर पोलीस पाटील सुभाष जुलालसिंग पाटील, तसेच जामनेर नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर यांनी मध्यस्थीचे महत्त्वपूर्ण कार्य पार पाडून दोन्ही पक्षकारांमध्ये समेट घडवून आणला.

या सामोपचाराच्या निमित्ताने तहसीलदार जामनेर (नानासाहेब आगळे) यांच्या हस्ते दोन्ही पक्षकारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व गावातील नागरिकांनी याचे विशेष कौतुक केले. 

प्रशासनाकडून विशेष आवाहन:

जामनेर तालुक्यातील इतर शेतकरी बांधवांनी देखील शेत शिवारातील पानंद रस्ते, शेत रस्त्यांचे वाद व वहिवाट विषयक प्रश्न सामोपचारातून सोडवावेत, जेणेकरून न्यायालयीन खर्च, वेळ व मनस्ताप वाचेल आणि गावांमध्ये सामाजिक सलोखा व विकासास चालना मिळेल.

अशा प्रकारचे समंजस निर्णय हा इतर गावांसाठीही आदर्श ठरेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *