जळगाव,दि.27(प्रतिनिधी) ग्रामीण भागामध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनात निर्माण झालेल्या सुविधांचा वापर तसेच सार्वजनिक ठिकाणी असलेली परिसर स्वच्छता शिवाय प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन बदललेल्या मानसिकतेची माहिती घेण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 अंतर्गत पाहणी करण्यात येत आहे. यासाठी केंद्राची समिती जिल्ह्यात दाखल झाली असून सर्व ग्रामपंचायतींनी मिळून लोकसहभाग व श्रमदानातून या सार्वजनिक सुविधांचा पुरेपूर वापर करत परिसराची स्वच्छता करून स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 मूल्यांकन कार्यक्रमात सहभाग नोंदवून जिल्ह्याचा लौकिक वाढवावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.
जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण या उपक्रमामध्ये सर्व ग्रामपंचायती सहभागी होत असतात. केंद्र शासनाच्या वतीने प्रत्येक ग्रामपंचायतीची अद्यावत माहिती घेऊन उभारण्यात आलेल्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या सुविधांची चाचणी व तपासणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक जिल्ह्यात तपासणी करीत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी यांना निर्देश दिले आहेत. यावेळी सदर मूल्यांकन तपासणीचे सनियंत्रण पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक डॉ. सचिन पानझडे करत आहेत.
या पाहणी दरम्यान प्लास्टिक संकलन व व्यवस्थापन म्हणजेच वर्गीकरण केंद्राची पाहणी, खतखड्यांचे व्यवस्थापन, परिसर स्वच्छता तसेच गृहभेटीतून मिळणारी माहिती इत्यादी बाबत गुणांकन होणार आहे. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या सुविधांबाबत थेट निरीक्षणासाठी 120 गुण आहेत
ग्रामस्थांच्या प्रतिसादासाठी 100 गुण, गावातील सुविधांचा वापराबाबत 240 गुण तर प्रत्यक्ष पाहणी व निरीक्षणा दरम्यान 540 गुणांची प्रश्नावली असणार आहे असे एकूण 1000 गुणांपैकी प्राप्त होणाऱ्या गुणांच्या आधारे देशातील व महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ सुंदर गाव व ग्रामपंचायत या मोहिमेदरम्यान घोषित होणार आहे.
***************************************
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 अंतर्गत गावांची तपासणी केंद्र शासनाच्या त्रयस्थ संस्थेमार्फत होत असल्याने गावातील धार्मिक स्थळे, शाळा, अंगणवाडी परिसर, बाजार तळ, नॅडेप, शोषखड्डे इ. सुविधांचा वापर अद्यावत करावा. या बाबत गावस्तरावरील संबंधित यंत्रणांनी सज्ज राहावे. असे आवाहन प्रकल्प संचालक डॉ.सचिन पानझडे यांनी केले आहे.
Leave a Reply