जामनेर (प्रतिनिधी)”समृद्ध शिक्षकच शिक्षण प्रक्रियेचा खरा प्राण आहे,” असे प्रभावी मत सुलभक तथा सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक शंकर भामेरे यांनी व्यक्त केले. ते जामनेर येथे सुरू असलेल्या वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षणामध्ये ‘अध्यापन शास्त्रीय दृष्टिकोन’ या विषयावर मार्गदर्शन करत होते.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिक्षकांनी स्वयं-समृद्ध होण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. विविध कृतींच्या माध्यमातून अध्यापन प्रक्रियेतील शिक्षकांची महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी उपस्थितांसमोर प्रभावीपणे मांडली.
या प्रशिक्षणाचे आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव आणि पंचायत समिती, जामनेर शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण २ जूनपासून जामनेर येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सुरू झाले असून, याचा समारोप उदया गुरुवारी (दि. १२ जून) होणार आहे.
प्रशिक्षणासाठी माध्यमिक विभागाच्या वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी दोन, प्राथमिक विभागासाठी एक, आणि निवड वेतनश्रेणीसाठी एक अशा चार कुलांची रचना करण्यात आली आहे. बोदवड व जामनेर तालुक्यातील १८८ शिक्षक या उपक्रमात सहभागी झाले आहेत.
प्रशिक्षणास प्राचार्य डॉ. अनिल झोपे, जिल्हा समन्वयक डॉ. सी. डी. साळुंखे, डॉ. जगन्नाथ दरंदले, आणि डॉ. प्रतिभा भावसार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. उपशिक्षणाधिकारी विजय सरोदे प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक म्हणून कार्य पाहत असून, महेंद्र नाईक आणि पंकज रानोटकर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
या प्रशिक्षणासाठी १६ तज्ज्ञ सुलभकांची टीम कार्यरत असून, प्रा. समीर घोडेस्वार, प्रा. सरला महाले, प्रा. शुभांगी चौधरी, रणजीत जगताप, मंगला जवळकर, सुदाम चव्हाण, शंकर भामेरे, आकाश तायडे, रंजना कोळी, अश्विनी पाटील, राजेश सांगोरे, पंडित बाविस्कर, कैलास महाजन व सविता वाघुळदे हे मार्गदर्शन करत आहेत.
वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी किमान १२ वर्षे आणि निवड वेतनश्रेणीसाठी २४ वर्षांहून अधिक सेवा केलेल्या शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरत आहे. यात राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, आरटीई २००९, व शिक्षणातील नवे प्रवाह यांची सखोल माहिती दिली जात आहे.
प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थी शिक्षक उल्हास पाटील म्हणाले, “या प्रशिक्षणातून आम्हाला नवी दृष्टी मिळाली आहे. दैनंदिन अध्यापन प्रक्रियेत आम्ही नक्कीच विविध नवकौशल्यांचा उपयोग करू.”
Leave a Reply