जामनेर (प्रतिनिधी) : उत्तर महाराष्ट्रातील चारही जिल्ह्यांमध्ये महायुतीने वर्चस्व राखले.. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजनांनी केलेल्या प्लॅनिंगचा संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात डंका वाजताना दिसतोय.. नाशिक, जळगाव, धुळे व नंदूरबार जिल्ह्यात लढविलेल्या सर्व जागा भाजपने जिंकल्या.. पक्षाच्या सूक्ष्म नियोजनासोबत महाजनांचे पडद्यामागील ‘प्लॅनिंग’ही यशस्वी ठरल्याचे मानले जात आहे.
गिरीश महाजन. महायुतीच्या सरकारमधील प्रभावी मंत्री. केवळ भाजपचेच नव्हे तर सरकारवरही काही आपत्ती आली तर त्या आपत्तीच्या निवारणार्थ धावून जाणारा नेता म्हणून त्यांची गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राला झालेली ओळख. तीस वर्षांपासून सातत्याने जामनेर मतदारसंघातून निवडून येणाऱ्या महाजनांनी यंदा सातव्यांदा विजय मिळवत विक्रम नोंदवला आहे. शिवाय, उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ सोडला तर ते २०१४पासून राज्य मंत्रिमंडळात मंत्री आहे. या त्यांच्या दीर्घ अनुभवाच्या आणि खास कार्यशैलीमुळेही राज्यातील नेते काही विशिष्ट प्रकारच्या मोहिमा त्यांच्यावर सोपवत असतात.
भाजपच्या नेतृत्वाने त्यातूनच महाजनांकडे उत्तर महाराष्ट्राची धुरा सोपवली आहे. या क्षेत्रातील चारही जिल्ह्यांमध्ये कुठे काहीही झाले तर महाजन धावून जाणार आणि समस्येवर तोडगा काढणार, असे त्यांचे काम. आताही या विधानसभा निवडणुकीत प्रतिकूल स्थिती असताना महाजनांनी उत्तर महाराष्ट्रात भाजप लढवित असलेल्या १६ जागांची जबाबदारी स्वीकारली. नाशिक जिल्ह्यातील ५, जळगाव जिल्ह्यातील ५, धुळे जिल्ह्यात ४ आणि नंदुरबार जिल्ह्यातील २ अशा जागांचा त्याच समावेश होता. त्या- त्या ठिकाणच्या पदाधिकारी- कार्यकर्त्यांना जबाबदारीचे वाटप करुन, त्यासंबंधी कामांचे विकेंद्रीकरण करुन महाजनांनी त्यावर केवळ ‘मॉनिटरिंग’ केले.. आणि परिणाम म्हणून शनिवारच्या निकालात या सर्व १६ जागांवर भाजपला यश मिळविता आले.
त्यातील धुळे शहर व ग्रामीण, जळगाव जिल्ह्यातील रावेर या जागांवर अत्यंत प्रतिकूल स्थितीत यश मिळाले आहे. अर्थात, पक्षाच्या स्थानिक नेते, पदाधिकारी- कार्यकर्त्यांचे परिश्रम त्यामागे आहेच. पण, महाजनांची भूमिकाही त्यासाठी महत्त्वाची ठरली आहे, असे म्हणता येईल.
Leave a Reply