मुंबई /मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज ‘वेव्हज् 2025’ परिषदेत एकूण ₹8000 कोटींचे विविध सामंजस्य करार झाले. हे करार शिक्षण, चित्रपटसृष्टी आणि गुंतवणूक या क्षेत्रांमध्ये भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या जागतिक स्तरावर होत असलेल्या प्रगतीचे द्योतक आहेत. सिडकोमार्फत युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया या जगप्रसिद्ध विद्यापीठांशी प्रत्येकी ₹1500 कोटींचे करार झाले असून हे करार नवी मुंबईत उभारल्या जाणाऱ्या ‘एज्यू सिटी’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या संदर्भात आहेत. या माध्यमातून परदेशात उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना देशातच आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळणार आहे.
या व्यतिरिक्त राज्य सरकारच्या उद्योग विभागामार्फत प्राईम फोकस या नामवंत कंपनीसोबत ₹3000 कोटी आणि गोदरेजसोबत ₹2000 कोटींचे करार करण्यात आले. या करारांमुळे राज्यात चित्रपट निर्मिती, स्टुडिओ सुविधा, नवतंत्रज्ञान आणि क्रिएटिव्ह क्षेत्रातील गुंतवणुकीला मोठा चालना मिळणार आहे. गोदरेजसारख्या विश्वासार्ह कंपनीकडून उभारला जाणारा स्टुडिओ जागतिक दर्जाचा आणि उत्कृष्टतेचा नवा आदर्श ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमात सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हर्चुअल बेल वाजवून NSE इंडायसेस लिमिटेडने ‘निफ्टी वेव्हज् इंडेक्स’ चा शुभारंभ केला. या विशेष निर्देशांकात मीडिया, मनोरंजन आणि गेमिंग क्षेत्रातील 43 आघाडीच्या सूचीबद्ध कंपन्यांचा समावेश असून, त्यातून या क्षेत्रांमध्ये जागतिक गुंतवणूक आकर्षित होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, नव्या शैक्षणिक धोरणामुळे भारताने आपले दरवाजे जगासाठी खुले केले आहे. या धोरणाचा लाभ घेत आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्तम संस्था आता भारतात येणार आहेत. यामुळे विकसित भारताच्या दिशेने एक भक्कम पाऊल पडत असून करार झालेल्या सर्व संस्थांना राज्य शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्य सचिव आणि वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
Leave a Reply