मुंबई /मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभवनात घेतलेल्या बैठकीत राज्याच्या भविष्यवेधी विकासासाठी भूस्थानिक (Geo-spatial) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) यांची सांगड घालून ‘महाटेक’ संस्थेची निर्मिती करण्याचे निर्देश दिले. या संस्थेमुळे राज्याच्या नियोजन प्रक्रियेला गती मिळेल आणि ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टपूर्तीत मोठा हातभार लागेल.
‘महाटेक’ ही संस्था अवकाश तंत्रज्ञान आणि भूस्थानिक तंत्रज्ञानाचा वापर करून मालमत्ता व्यवस्थापन, शहरी विकास, नैसर्गिक संसाधनांचे नियोजन आणि शासकीय विभागांच्या योजनांचे प्रभावी नियोजन करेल. यामुळे लोकाभिमुख आणि पारदर्शक प्रशासनाला गती मिळेल. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अँप्लिकेशन सेंटर (MRSA-C) ही संस्था राज्यातील नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन, शहरी विकास आणि बदलांसाठी दीर्घकाळापासून काम करीत आहे. या संस्थेकडे मोठ्या प्रमाणावर डेटा उपलब्ध आहे. मात्र, या डेटा उपयोगासाठी नागपूर व पुणे केंद्रांचे सक्षमीकरण आणि बळकटीकरण करणे आवश्यक आहे. याकरिता नागपूर येथे स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात यावी आणि मुंबईतही आधुनिक उपकेंद्र सुरू करावे, तसेच राज्यात प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी नियोजन विभागात स्वतंत्र गतीशक्ती सेल स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले.
मुख्य वनसंरक्षक रविकिरण गोवेकर यांनी या बैठकीत भूस्थानिक आणि अवकाश तंत्रज्ञानाच्या प्रशासनातील वापराबाबत सादरीकरण केले. यावेळी अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply