मुंबई /राज्यातील पत्रकारांच्या विविध मागण्यांवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाची सह्याद्री अतिथिगृह येथे बैठक झाली. यावेळी पत्रकार सन्मान योजना, गृहनिर्माण, आरोग्य सेवा व प्रवास सवलती यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेतील अटींचा पुनर्विचार करत अनुभवाची अट 30 वर्षांवरून 25 आणि वयोमर्यादा 60 वरून 58 वर्षांवर आणण्याच्या पत्रकार संघटनांकडून आलेल्या मागणीनुसार, यासंदर्भात सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले.
कांदिवलीतील पत्रकार गृहनिर्माण योजनेतील सदनिकांचे दर कमी करण्यासाठी म्हाडाने योग्य तो तोडगा काढावा, शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी निधीअंतर्गत वैद्यकीय मदतीची मर्यादा वाढवण्याबाबत विचार करण्यात यावा, तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेसोबत सुसंगत योजना तयार करून त्याद्वारे पत्रकारांना आरोग्य सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी आवश्यक निर्णय घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटी महामंडळाच्या शिवनेरी व शिवाई बसमध्ये सवलत देण्यासंबंधी योग्य निर्णय घेण्यासही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मंत्रालय प्रवेशासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘फेशियल रिकग्निशन’ प्रणालीची अंमलबजावणी येत्या 15 दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले.
या बैठकीस मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply