जामनेर पंचायत समितीला ISO मानांकन प्राप्त – जिल्ह्यातील पहिली पंचायत समिती ठरली

जामनेर(प्रतिनिधी)जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ग्रामपंचायत व पंचायत समित्यांच्या सक्षमीकरणाच्या मोहिमेला मोठे यश लाभले आहे.

या मोहिमेचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना आंतरराष्ट्रीय दर्जाचे ISO मानांकन मिळवून देण्याचे व्यापक उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या प्रयत्नांची पहिली फलश्रुती म्हणून जामनेर पंचायत समितीने ISO 9001-2015मानांकन प्राप्त करून जिल्ह्यातील पहिली ISO प्रमाणित पंचायत समिती होण्याचा मान पटकावला आहे.

हा मानांकन प्राप्त करण्यासाठी जामनेर पंचायत समितीने प्रशासनिक कार्यपद्धती, सेवा वितरण, नागरिकाभिमुखता, पारदर्शकता आणि गुणवत्तापूर्ण कामकाज यामध्ये उल्लेखनीय सुधारणा केल्या. समितीच्या कार्यप्रणालीतील गुणवत्ता व्यवस्थापन, दस्तऐवजीकरण, जनसेवा प्रक्रियेतील शिस्तबद्धता आणि कर्मचारी प्रशिक्षण या घटकांवर विशेष भर देण्यात आला.

आयएसओ ISO मानांकन ट्राफी अनिल येवले व्यवस्थापक यांच्या हस्ते श्रीकृष्ण इंगळे गटविकास अधिकारी पंचायत समिती जामनेर यांनी पंचायत समितीच्या सर्व विभाग प्रमुख अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत स्वीकारली व या ISO मानांकन मिळवून देण्यात सर्व सहकार्याचे योगदान असल्याच्या प्रतिक्रिया गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांनी व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या.

ISO मानांकन ही केवळ गुणवत्ता मान्यता नसून, ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सुशासन व कार्यक्षमतेकडे वाटचाल दर्शवणारा सकारात्मक टप्पा ठरला आहे.

या यशाबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी संपूर्ण जामनेर पंचायत समितीच्या पथकाचे अभिनंदन केले असून, जिल्ह्यातील इतर पंचायत समित्यांनीही यापासून प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *