जामनेर(प्रतिनिधी)जामनेर तालुक्यातील गोंडखेड येथील शेतकऱ्यांनी 1992 साली आपल्या बापजाद्यांच्या जमिनी जामनेर तालुका सहकारी साखर कारखाना लिमिटेडसाठी दिल्या. त्या वेळी आमदार, खासदार आणि कारखान्याच्या चेअरमन यांनी आश्वासन दिले होते की, कारखाना सुरू झाल्यावर स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्याने नोकऱ्या दिल्या जातील, रोजगाराच्या संधी वाढतील, गावचा विकास होईल. मात्र 32 वर्षांचा प्रदीर्घ काळ उलटूनही केवळ पत्र्याचं शेड उभं राहिलं, कारखाना सुरूच झालेला नाही.आता कारखान्याच्या चेअरमन सुभाष चंपालाल बोहरा उर्फ राजू शेठ बोहरा यांनी अलीकडेच पत्रकार परिषद घेत, कारखान्याची जमीन विकण्याचा प्रस्ताव मांडल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. गोंडखेडसह परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत चेअरमन बोहरा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना निवेदन दिलं. या निवेदनात शेतकऱ्यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली जमिनी आमच्या आहेत, त्या कुणालाही विकू नका, आम्हालाच परत द्या.शेतकऱ्यांनी सांगितलं की, आम्ही अल्पभूधारक आहोत, जमिनी साखर कारखान्यासाठी दिल्या, मात्र 32 वर्षांनी कारखाना सुरू न होता, जमीन विक्रीचा प्रस्ताव ठेवणं हा आमच्यावर अन्याय आहे. जर विक्रीच करायची असेल, तर ती जमीन आम्हालाच परत द्या, आम्ही बाजारभावानुसार पैसे भरण्यास तयार आहोत.शेतकऱ्यांनी यापूर्वीही 15/09/2018, 01/08/2024 आणि 24/05/2025 रोजी ठराव घेऊन सहकार मंत्री, पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या मागण्या मांडल्या होत्या. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे.शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे साखर कारखान्यासाठी दिलेल्या काही जमिनींवर आजही काही शेतकरी शेती करत आहेत आणि आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. या शेतकऱ्यांमध्ये रंजीत शेनफडू राजपूत, प्रभू शेनफडू राजपूत, जगतसिंग तोलसिंग परदेशी, संजय भगवान परदेशी, विजय भगवान परदेशी, शांताराम सखाराम जाधव, संजय भगवान परदेशी, शांताराम शालिकराम पाटील, मधुकर शालिकराम पाटील, रणजीत मधुकर पाटील, सिताराम एकनाथ मगर, ईश्वर एकनाथ मगर, भगत भालचंद राजपूत यांचा समावेश आहे.शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार संचालक मंडळाने नाशिकच्या व्हॅल्यू वेअर कंपनीकडून जमिनीचं व्हॅल्युवेशन करून विक्रीचा प्रस्ताव तयार केला जात आहे, त्याला शेतकऱ्यांचा ठाम विरोध आहे. शेतकऱ्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की, जमिनी आमच्याच आहेत, त्या कोणालाही विकू नका,आम्हालाच परत द्या अशी मागणी केली आहे.शेतकरी रंजीत राजपूत, प्रभू राजपूत, अर्जुन चोपडे, भगवान चोपडे, जगतसिंग परदेशी, संजय परदेशी, विजय परदेशी, शांताराम जाधव, रवींद्र चोपडे, विलास परदेशी, शांताराम पाटील, मधुकर पाटील, रणजीत पाटील, सिताराम मगर, ईश्वर मगर, भगत राजपूत, भगतसिंग परदेशी, सयाबाई तुकाराम, बन्सीलाल राजपूत, संग्रामसिंग राजपूत आदींनी आपली तीव्र भावना व्यक्त करत कारखान्याच्या विक्रीला विरोध दर्शवला.आगामी 31 मे रोजी होणारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभेत काय निर्णय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply