जामनेर(प्रतिनिधी)भारत सरकार महत्त्वकांक्षी प्रकल्प अंतर्गत ‘नाफेड’व ‘कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था’ यांच्या मार्गदर्शनाने स्थापन झालेल्या गोपद्म फेड शेतकरी उत्पादक कंपनी यांनी भारतीय औद्योगिक महासंघाचा ‘सीआयआय सर्वोत्कृष्ट एफपीओ’ पुरस्कार जिंकला आहे. महाराष्ट्रातील जामनेर येथील ‘गोपद्म एफपीसी’ला मूल्यवर्धन आणि ब्रॅण्डिंग श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आले. देशभरातून विविध पुरस्कार श्रेणींसाठी 140 अर्ज आले होते त्यापैकी 12 एफपीओंची निवड करण्यात आली त्यात जामनेरच्या ‘गोपद्म एफपीसी’चा समावेश आहे. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणात आणि ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या शेतकरी उत्पादक संस्थांचा “सीआयआय” तर्फे सन्मान केला जातो. शेतकरी आणि शेतकरी समुदाय विशेषता: अल्पभूधारकांना अधिक सक्षम बनवण्यासाठी ‘कृषीविकास’ ही संस्था शेतकरी उत्पादक संस्थांना मार्गदर्शन करते, त्यामध्ये गोपद्म शेतकरी उत्पादक कंपनी अग्रेसर आहे. जामनेर येथील शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत शेतकऱ्यांना विविध ब्रँड अंतर्गत विषमुक्त, भेसळमुक्त व आरोग्यदायी शेतमालास ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली असून गोशाळेच्या माध्यमातून कमी खर्चातील विषमुक्त शेतीचे प्रशिक्षण देणारे अनेक शेतकरी प्रतिनिधी कंपनी सोबत जुळलेले आहेत तसेच ऑनलाईन सर्व शासकीय योजना व कृषी सेवा, बँक कर्ज प्रक्रिया, कृषी विस्तार व मार्गदर्शन, प्रकल्प अहवाल व प्रस्ताव, शासकीय अनुदानासह यातील सर्व घटकांचे मार्गदर्शन व सुविधा या एका छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच ‘गोपद्म एफपीसी’ ने गोपालनातून आर्थिक समृद्धतेसाठी शेण, गोमूत्राचे मूल्यवर्धन करून विविध आरोग्यदायी औषधी, अर्क उत्पादने, सौंदर्यप्रसाधने, शेती उपयुक्त विषमुक्त खते, औषधे, घरगुती व आध्यात्मिक वापराच्या वस्तू निर्मितीतून नाविन्यपूर्ण ब्रँडसह रोजगारात चालना व महिलांना रोजगार संधी निर्माण केली आहे.
दि. १० डिसेंबर रोजी “इंडिया हॅबिटॅट सेंटर”,नवी दिल्ली येथे भारतीय उद्योग महासंघ व कृषी मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार सोहळ्यामध्ये श्री मिन्हांज आलम, (आय.ए.एस) अतिरिक्त सचिव, अन्न व उद्योग मंत्रालय, भारत सरकार, श्री.शिवकुमार, अध्यक्ष, भारतीय उद्योग महासंघ व राष्ट्रीय कृषी परिषद नवी दिल्ली, प्रा.ग्लेन डेनिंग,कोलंबिया विद्यापीठाचे संस्थापक संचालक व सौ. सीमा अरोरा, उपमहासंचालक, भारतीय उद्योग महासंघ, श्री संजय सचेती, संचालक, भारतीय उद्योग महासंघ इ. मान्यवरांच्या हस्ते “गोपद्म एफपीसी”चा गौरव करण्यात आला. कंपनीच्या वतीने चेअरमन श्री.प्रदीप महाजन व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रोहन लोखंडे यांनी पुरस्कार स्वीकारला.
जामनेरची गोपद्म शेतकरी उत्पादक कंपनी नवी दिल्ली येथे ‘सर्वोत्कृष्ट एफपीओ’पुरस्काराने सन्मानित.

Leave a Reply