जागतिक पटलावर देशाच्या खेळाडूंचा डंका ही अभिमानास्पद बाब-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


जामनेर (प्रतिनिधी )दि.१६: सध्या जागतिक पटलावर देशाच्या विशेषत: महाराष्ट्रातील खेळाडू आपले नाव कमावत असून ही देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जामनेर येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आयोजित केलेल्या ‘नमो कुस्ती महा कुंभ दोन’ अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, अनिल पाटील, संजय कुटे, चंद्रकांत सोनवणे, चंद्रकांत पाटील, अमोल पाटील, अमोल जावळे, अनुपभैय्या अग्रवाल यांच्यासह कुस्तीगीर संघटनेचे रामदास तडस, जामनेरच्या नगराध्यक्ष साधनाताई महाजन आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ऑलम्पिक स्पर्धा, कॉमनवेल्थ, एशियन गेम अशा विविध स्पर्धांमध्ये देशातील खेळाडूंनी विशेषत: महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. मागील काळात मॅटवरील कुस्तीमुळे आपण थोडे मागे पडलो होतो. परंतु मातीवरील कुस्ती स्पर्धेत आपल्या देशाचे खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. कुस्तीच्या माध्यमातून देशाला ऑलम्पिकमधील पहिले पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव हे कुस्तीपटू होते. आजही महाराष्ट्राचे खेळाडू विजय चौधरी, सोनाली मंडलिक, राजीव पटेल यांनी आपल्या खेळाची चमक दाखवून परदेशातील कुस्तीपटूवर मात केली, असे सांगून त्यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.

oplus_2

या स्पर्धेला नऊ देशातील जागतिक स्तरावरील कुस्तीपटू उपस्थित राहिल्याबद्दल या स्पर्धेची रंगत आणखीनच वाढल्याचे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मंत्री गिरीश महाजन यांचेही त्यांनी यावेळी कौतुक केले. या स्पर्धेला नागरिकांचा मोठा सहभाग लाभला हेच या स्पर्धेचे यश असल्याचे श्री.फडणवीस म्हणाले.

या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारतासह फ्रान्स, रोमानिया इस्टोनिया, उझेकिस्तान, जॉर्जिया आदी देशातील जागतिक विजेते ओलंपियन, हिंदकेसरी, रुस्तम ए हिंद, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी आदी विजेत्या खेळाडूंनी सहभाग घेतला. अशा स्पर्धा जामनेरमध्ये होणे हे कुस्तीसाठी चांगले वातावरण असल्याचेही ते म्हणाले.

oplus_2

यावेळी विजेत्या कुस्तीपट्टूना मान्यवरांच्या हस्ते चांदीची गदा प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाला कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी, विविध देशातून आलेले कुस्तीगीर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *