नांदेड (प्रतिनिधी)ग्राहकाचे प्रश्न जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित ग्राहक संरक्षण परिषदेत पोट तिडकीने मांडण्यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे सदस्य प्रयत्नरत आहेत. परंतु प्रशासनाचे अपेक्षित सहकार्य मिळत नाही, या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय ग्राहक संरक्षण परिषदेच्या कार्याला उत्तम गती देण्यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र लवकरच नवीन आयाम जोडणार असून लवकरच ते आपल्यापर्यंत पोहोचेल व सर्वसामान्यांच्या समस्या जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित झालेल्या ग्राहक संरक्षण परिषदेत सुटण्यास चालना मिळेल असे प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्य अध्यक्ष डाॅ. विजय लाड यांनी केले. नांदेड व हिंगोली जिल्ह्याच्या संयुक्त अभ्यासवर्गात येथील नेताजी सुभाषचंद्र महाविद्यालयात अध्यक्षीय समारोपात ते मार्गदर्शन करीत होते.
ते पुढे बोलताना म्हणाले की, राज्याच्या सर्व जिल्ह्यात मिळून ग्राहक संरक्षण परिषदेवर 200 अशाकीय सदस्य आहेत. हे सदस्य सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
राज्यात बहुसंख्य ठिकाणी, जिल्हाधिकार्यांच्या पुढाकाराने ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठका घेतल्या जातात. परंतु काही ठिकाणी प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे सांगून ग्राहक पंचायत महाराष्ट्र यावरच प्रकाश टाकून प्रशासन व सरकारच्या सहकार्याने जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद आणखी प्रबळ करण्याचा प्रयत्न या नवीन आयामाच्या माध्यमातून केला जाणार आहे.
या अभ्यासवर्गाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पांडे म्हणाले ग्राहकतीर्थ बिंदु माधव जोशी यांचे कार्य मी पाहत होतो. परंतु हे कार्य किती महत्त्वाचे आहे व ते आज किती मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. किती मोठे कार्य ग्राहकतीर्थांनी उभे केले आहे, त्यांच्या प्रेरणेतून आज ग्राहक पंचायत महाराष्ट्र ते कार्य करीत आहे. ते आणखी प्रबळ होऊन सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यास यशस्वी होवो ही सदिच्छा देऊन त्यांनी अभ्यासवर्गास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय संघटक इंजि.बालाजी लांडगे यांनी केले.
या अभ्यासवर्गात प्रा. हेमंत वडणे, हेमंत मराठे, डाॅ. दीपक कासराळीकर, अॅड. आनंद कृष्णापूरकर यांनी वेगवेगळ्या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचलन डॉक्टर सायन्ना मठमवार यांनी केले आणि आभार प्रशांत वैद्य यांनी मानले. या अभ्यासवर्गास नांदेड जिल्हा, व देगलूर, मुखेड, मुदखेड, बिलोली आणि अर्धापूर तालुक्यातील तसेच हिंगोली जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
Leave a Reply