अवैध विक्रीसाठी देशी व विदेशी दारु नेत असलेल्या इंडिका कारसह दोघांना भोकर पोलीसांनी पकडले

भोकर/प्रतिनिधी : अवैध विक्रीसाठी देशी व विदेशी दारु नेत असलेल्या इंडिका विस्टा कारसह दोघांना भोकर पोलीसांनी पकडले असून दारु आणि कार असा एकूण ३ लाख १३ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तसेच या प्रकरणी ‘त्या’ दोघांविरुद्ध भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोकर पोलीस ठाण्यातील सेवारत जमादार सोनाजी कानगुले,जमादार विष्णू खिलारे व पो.कॉ.प्रमोद जोंधळे हे दि.११ मे २०२५ रोजी भोकर शहरात रात्रीची गस्त घालण्यासाठी कर्तव्यावर निघाले असता त्यांना गोपनीय माहिती मिळाली की,एका कार मधून देशी व विदेशी दारू अवैध विक्रीसाठी नेल्या जात आहे.ही माहिती प्राप्त झाल्यावरुन पो‌.नि.अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार उपरोक्त पोलीसांनी रात्री ७:०० वाजताच्या दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते बस स्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पंचायत समिती परिसरात पांढऱ्या रंगाची इंडिका विस्टा क्रमांक एम.एच.२१ व्ही.५३१० ही कार पकडली.यावेळी कारची तपासणी केली असता कार मध्ये चालक पवन लक्ष्मण कुरमोड(२६)रा.रहाटी ता. भोकर व सुभाष चंद्रकांत वाघमारे(३०)रा.नेहरूनगर भोकर हे दोघे देशी आणि विदेशी अवैध विक्रीसाठी नेत असलेल्या दारुसह मिळून आले. यामध्ये भिंगरी संत्रा देशी दारुच्या १८० मि.ली.क्षमतेच्या प्रत्येकी ७० रुपये किमतीच्या ३८४ काचेच्या सिलबंद असलेल्या बॉटल चे २६ हजार ८८० रुपये किमतचे ८ बॉक्स,भिंगरी संत्रा देशी दारुच्या ९० मि.ली.क्षमतेच्या प्रत्येकी ३५ रुपये किमतीच्या प्लास्टिक च्या सिलबंद असलेल्या ४ हजार १३० रुपयांच्या ११८ बॉटल,रॉयल स्टॅग लेबल असलेल्या विदेशी दारुच्या १८० मि.ली. क्षमतेच्या प्रत्येकी १९० रुपये किमतीच्या एकूण ३ हजार ८०० रुपयाच्या २० बॉटल,मॅक डॉवेल नंबर वन लेबल असलेल्या विदेशी दारुच्या १८० मि.ली.क्षमतेच्या प्रत्येकी १६० रुपये किमतीच्या एकूण ३ हजार २०० रुपयाच्या २० बॉटल अशा प्रकारे एकूण ३८ हजार १० रुपयांची देशी व विदेशी दारू मिळून आली.तसेच अवैध विक्रीसाठी देशी व विदेशी दारू घेऊन जात असलेली अंदाजे २ लाख ७० हजार रुपये किंमतीची टाटा इंडिका विस्टा कार अशा प्रकारे एकूण ३ लाख १३ हजार १० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी सरकार पक्षातर्फे दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.नं.२४२/ २५ कलम ६५(ई),८३ म.दा.का.अन्वये उपरोक्त उल्लेखीत दोघांविरुद्ध भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पो.नि.अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास भोकर पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *