जामनेर (प्रतिनिधी): “मुलगी जन्माला येणे ही देवाची अनमोल देणगी आहे; तिच्या आगमनाने घरात आनंद फुलतोच, पण या आनंदाचा सुगंध निसर्गातही पसरला पाहिजे, मुलगी ही घरातील भाग्यलक्ष्मी; तिचा जन्म साजरा करताना निसर्गालाही जीवन देऊया,” या भावनेतून बेटावद खुर्द येथील रहिवासी सौ. स्नेहल व श्री. रोहन दिलीप लोखंडे यांच्या घरी जन्मलेल्या कन्यारत्नाचे स्वागत एका अनोख्या पद्धतीने करण्यात आले.
‘श्रीनिका’च्या जन्माचा आनंद लोखंडे कुटुंबीय व मित्रपरिवाराने गावाजवळील शेतपरिसरात 321 रोपे लावून साजरा केला. फळझाडे, पर्यावरणपूरक आणि सावलीदार झाडे लावून कन्याभिमानातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देऊन परिसर हिरवागार करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
“जशी आमची लेक ‘श्रीनिका’ प्रेमाने वाढेल, तशीच या रोपांचीही काळजी घेऊन त्यांना हिरवीगार करणार आहोत, शेवटी आपण निसर्ग वाढविला तर निसर्ग आपल्याला कसलीही कमी भासु देणार नाही म्हणून निसर्ग जपायलाच हवा” असे भावनिक उद्गार श्री. रोहन लोखंडे यांनी व्यक्त केले.
या उपक्रमात मुलीचा जन्म हा उत्सव आहे हा संदेश समाजाला देण्यात आला. कन्या जन्माबद्दलचा आनंद केवळ फटाके व गोडधोडपुरता मर्यादित न राहता पर्यावरणपूरक मार्गाने व्यक्त करता येतो, याचा आदर्श दाखवून दिला.
“मुलगी ही केवळ घरातील आनंदाचा सोहळा नसून समाजासाठीही आशेचा किरण आहे. कन्या जन्म आणि पर्यावरण संवर्धन यांचा संगम घडवून आमच्या लोखंडे कुटुंबाने दिलेला आदर्श इतरांनीही अंगीकारावा,” असे मत श्री.दिलीप लोखंडे यांनी व्यक्त केले.
या उपक्रमामुळे श्रीनिकाच्या जन्माचा आनंद तर सर्वांना मिळालाच, शिवाय गावात हिरवाई वाढविण्याचा संकल्पही बळकट झाला.पुढेही प्रत्येक वर्षी नवनवीन जिवनदायी वृक्षांची लागवड करणार असल्याचा मानस परिवाराने व्यक्त केला आहे. यापुढे प्रत्येक तरुणाने कन्यारत्न झाल्यास आपल्या परिसरात,शेतात शक्य होईल तितके वृक्ष लागवड करुन पर्यावरणास हातभार लावुन ‘कन्याजन्मोत्सव’ साजरा करावा असे प्रतिपादन श्री.रोहन लोखंडे यांनी केले.
Leave a Reply