बापूसाहेबांनी लावलेल्या रोपट्याचे, विशाल वटवृक्षात रूपांतर कापूस खरेदी सुरू करण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करणार — मुख्यमंत्री

जामनेर (प्रतिनिधी)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शेंदुर्णी, ता.जामनेर (जळगाव) येथे ‘शेंदुर्णी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमा’त, ‘अमृत गौरव ग्रंथाचे प्रकाशन’ व संस्थेच्या ‘आ. गजाननराव गरुड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया’च्या नूतन इमारतीची पायाभरणी करण्यात आली. याप्रसंगी आयोजित भव्य शेतकरी मेळाव्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबोधित केले.

स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर स्थापन झालेल्या संस्थेत आज येण्याची संधी मिळाली, ही अतिशय अभिमानाची गोष्ट असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. गावातल्या व सभोवतालच्या परिसरातील मुला मुलींना उत्तम शिक्षण मिळावे, यासाठी बापूसाहेब गरुड यांनी या संस्थेची स्थापना करत, येणाऱ्या अनेक पिढ्यांना शिक्षण सुविधा उपलब्ध करून दिली. सरपंच ते विधानसभा उपाध्यक्ष अशा अनेक भूमिकांना त्यांनी योग्य न्याय दिला. आज त्यांचे महान कार्य संस्था पुढे नेत आहे, याचा मनस्वी आनंद असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मोठ्या संख्येत येथे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बापूसाहेबांनी लावलेल्या छोट्याश्या रोपट्याचे, विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. संस्थेची निर्माण होणाऱ्या नूतन इमारतीची रचना अतिशय सुंदर आणि पर्यावरणपूरक असल्याने, विद्यार्थ्यांना त्याचा अधिक फायदा होईल असे, मत मुख्यमंत्री यांनी याप्रसंगी व्यक्त केले. तसेच संस्थेच्या कामकाजात येत असणाऱ्या अडीअडचणी प्राधान्यक्रमाने सोडवल्या जातील असे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासित केले.

या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास राज्य सरकार तत्पर आहे. सौर पंपासाठी पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना पुढच्या १५ दिवसात आणि मागणी नोंदवल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला २ महिन्याच्या आत सौर पंपाची जोडणी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सीसीआयने बंद केलेली कापूस खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली जाईल, कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा उत्पादित माल घरातच राहणार नाही, याची काळजी राज्य शासन घेईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी केले. तसेच यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘नगरोत्थान योजनेंतर्गत’ शेंदुर्णी नगरपंचायतीच्या मलनिस्सारण प्रकल्प व रस्ते प्रकल्पांचाही शुभारंभ करण्यात आला.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीष महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, खा. स्मिता वाघ, आ. संजय कुटे, आ. सुरेश (राजुमामा) भोळे, आ. मंगेश चव्हाण, दी शेंदुर्णी सेकंडरी को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष संजय गरुड पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *