अल्पवयीन मुलांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास पालकांना दोषी धरले जाणार

जामनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा पोलीस दला कडून सर्व पालकांना आवाहन करण्यात आले की त्यांनी आपल्या अल्पवयीन पाल्यांच्या ताब्यात कोणत्याही प्रकारचे वाहन देऊन त्यांचा जीव धोक्यात घालू नये. शाळा / संस्थेत शिकत असलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांचे पालक आपल्या मुलांना १८ वर्ष पूर्ण झालेले नसतांनाही व वाहन चालविण्याचा परवाना नसतांना वाहने ताब्यात देऊन शाळा, कोचिंग क्लासेस, दैनंदिन कामे इत्यादीसाठी पाठवत आहेत. ही बाब संपूर्णपणे बेजबाबदारपणाची व बेकायदेशीर असून अल्पवयीन मुलांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास पालकांना दोषी धरले जाणार आहे व त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, मोटर वाहन कायदा चे कलम ३, ४, ५, १८०, १८१, तसेच JJ Act कलम १८ अशा विविध कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. अल्पवयीन मुलांनी ५० CC पेक्षा जास्त क्षमतेचे वाहन चालवल्यास त्यासाठी आकारण्यात येणारा दंड २५,०००/- (अक्षरी पंचवीस हजार) रुपयांचा आहे, तसेच चालक-मालक व पालकांना ०३ वर्षांपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा देखील कायद्यात नमूद आहे. अपघात झाल्यास Insurance Claim देखील नाकारला जातो. गुन्हे दाखल झाल्यास संबंधित मुलांना कोणत्याही प्रकारची नोकरी, पासपोर्ट मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते.  तसेच दंडात्मक कारवाई झाल्यास वयाच्या २५ वर्षापर्यंत संबंधित मुला-मुलींना वाहन चालवण्याचा परवाना / लायसन्स मिळणार नाही किंवा एक वर्षापर्यंतची वाहन नोंदणी रद्द केली जाऊ शकते याची सर्व पालकांनी गंभीर्यपूर्वक नोंद घ्यावी. तरी जळगाव जिल्हा पोलीस दला कडून सर्व पालकांना आवाहन केले जात आहे की त्यांनी आपल्या अल्पवयीन पाल्यांच्या ताब्यात कोणत्याही प्रकारचे वाहन देऊन त्यांचा जीव धोक्यात घालू नये. सर्व पालकांना सूचित करण्यात येते की अल्पवयीन मुलांना वाहन चालू देण्याऐवजी त्यांना सायकल, ई-सायकलचा पर्याय उपलब्ध करून देणे जास्त सोईस्कर व सुरक्षित आहे. आपले स्तरावर देखील विद्यार्थ्यांचे समुपदेशन करावे तसेच सदरच्या पत्राला आपले कार्यालयात तसेच पालकांच्या / विद्यार्थ्यांच्या Whatsapp group वर प्रसिध्दी द्यावी असे पत्रा द्वारे आवाहन  डॉ. महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक, जळगावयांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *